औरंगाबाद – मारहाणीनंतर मृत्यूमुखी पडलेल्या ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत, या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली. यासाठी आज (मंगळवार) सकाळी पुंडलिकनगर पोलिस स्टेशनमध्ये जमाव जमला होता. नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
काय आहे प्रकरण
पुंडलिकनगर येथील गल्ली क्रमांक २ येथे राहाणारा सुनील बाबुराव मुंडलीक (३५) याचा सोमवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनील रविवारी रात्री १० वाजता पुंडलिकनगरकडे येत असताना रस्त्यात काही तरुणांसोबत त्याचे भांडण झाले. दुचाकी राँग साईडने घेतल्यावरुन त्यांच्यात भांडण झाले होते. यावेळी तरुणांनी सुनील मुंडलीक याला बेदम मारहाण केली. तशाच आवस्थेत सुनील रात्री ११ वाजता घरी पोहोचला. त्याने त्याच्यासोबत घडलेली सर्व हकिगत नातेवाईकांना सांगितली. दरम्यान, सोमवारी सकाळी ११ वाजता सुनील चक्कर येऊन पडला. नातेवाईकांनी त्याला तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान रात्री ७ वाजता त्याचा मृत्यू झाला.
पुंडलिकनगर परिसरात तरुणांनी त्याला जबर
मारहाण केली, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. सुनीलला
मारहाण करणाऱ्यांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी सकाळी
पुंडलीकनगर पोलिस स्टेशनमध्ये जमाव जमला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत
मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा पवित्रा जमावाने घेतला. यामुळे परिसरात तणाव
निर्माण झाला.
सुनिलच्या मृत्युमुळे दोन मुले उघड्यावर
हातावर पोट असलेला सुनील मिळेल ते काम करुन
आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्च्यात पत्नी आणि दोन लहान
मुलं आहेत. मोठी मुलगी सात वर्षांची तर मुलगा ५ वर्षांचा आहे. सुनीलच्या अकाली
मृत्यूने त्याचे कुटुंबिय उघड्यावर आले असल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली
आहे.
(संग्रहित छायाचित्र)










